Elon Musk च्या xAI मध्ये नोकरी; दर तासाला 5,500 रूपये पगार, तुम्हालाही काम करण्याची सुवर्णसंधी.. जाणून घ्या सविस्तर!
टेस्लाचे संस्थापक आणि जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती इलॉन मस्क (Elon Musk) यांची कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) कंपनी xAI भारतीय द्विभाषिक शिक्षकांची भरती करत आहे. कंपनी हिंदी आणि इंग्रजीमध्ये प्रवीण असलेल्या शिक्षकांना आपल्या टीममध्ये सामील करून AI डेटाबेस वाढवण्याचे आणि मॉडेल्स अपग्रेड करण्याचे उद्दिष्ट ठेवत आहे.
2023 मध्ये स्थापन झालेल्या xAI चे उद्दिष्ट AI च्या क्षेत्रात क्रांतिकारी बदल घडवून आणणे आहे. यासाठी कंपनी भाषा तज्ञांच्या मदतीने आपली AI क्षमता वाढवत आहे. xAI मध्ये ट्यूटरच्या भूमिकेत काम करणाऱ्यांना प्रति तास 35-65 डॉलर (अंदाजे 5,500 रुपये) पगार मिळेल. त्यांना उच्च दर्जाचा, लेबल केलेला डेटा तयार करणे आणि भाषा शिकण्यात मदत करणे असे काम असणार आहे. यामध्ये हिंदीसह अनेक भाषांमध्ये डेटा तयार करणे आणि त्यात बदल करणे या गोष्टींचा समावेश असणार आहे.
उमेदवारांना तांत्रिक लेखन, पत्रकारिता किंवा व्यावसायिक लेखनाचा अनुभव असावा. इंग्रजी आणि हिंदी दोन्ही भाषा येणे आवश्यक आहे. याव्यतिरिक्त, एखाद्याकडे संशोधन कौशल्ये आणि विविध स्त्रोत, डेटाबेस आणि ऑनलाइन संसाधने नेव्हिगेट करण्याची क्षमता देखील असणे आवश्यक आहे.
xAI द्वारे शिक्षकांना केवळ हिंदीच नव्हे तर कोरियन, व्हिएतनामी, चायनीज, जर्मन, रशियन, इटालियन, फ्रेंच, अरबी, इंडोनेशियन, तुर्की, पर्शियन, स्पॅनिश आणि पोर्तुगीज सारख्या भाषांमध्ये ही सहकार्य करणे अपेक्षित आहे.
लेखन, संशोधन आणि द्विभाषिक संवादात पारंगत असलेल्या भारतीयांसाठी ही नोकरी एक सुवर्णसंधी आहे. इलॉन मस्कच्या xAI मध्ये काम केल्याने त्याला आंतरराष्ट्रीय मान्यता आणि अनुभव दोन्ही मिळेल.