मोठी बातमी! लाडकी बहिण योजना स्थगित, नवे अर्जही स्वीकारणे बंद; नेमकं कारण काय? Ladki Bahin Yojana
मुंबई | राज्यातील बहुचर्चित योजना स्थगित करण्यात आली आहे. लाडकी बहीण (Ladki Bahin Yojana) योजनेतील पात्र महिलांसाठी ही मोठी निराशाजनक बातमी आहे. आतापर्यंत या योजनेअंतर्गत २ कोटी २० लाखांहून अधिक पात्र महिलांना पाच महिन्यांचे हप्ते प्राप्त झाले आहेत. परंतु, निवडणुकीच्या काळात पुढचे हप्ते महिलांना मिळू शकणार नाहीत. निवडणूक आयोगाने ही योजना स्थगित करण्याचे आदेश दिले आहेत.
केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार, राज्यात २० नोव्हेंबरला एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. त्यामुळे राज्यात आचारसंहिता लागू झाली आहे. आचारसंहितेच्या काळात मतदारांवर थेट प्रभाव टाकणाऱ्या आर्थिक योजना बंद कराव्यात अशा सूचना निवडणूक आयोगाने राज्य सरकारला दिल्या आहेत. त्यानुसार, महिला आणि बालकल्याण विभागाकडून या योजनेसाठी लागणारा निधी थांबवला आहे.
राज्यातील विधानसभा निवडणुका पार पडेपर्यंत लाडकी बहीण योजनेचे पैसे पात्र महिलांना मिळणार नाहीत. दरम्यान, राज्य सरकारने या योजनेअंतर्गत ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे एकत्र पैसे दिले होते. त्यामुळे आता डिसेंबर महिन्याच्या हप्त्याची प्रतिक्षा करावी लागणार आहे. तात्पुरत्या स्वरुपात लाडकी बहीण योजनेला स्थगिती मिळाली असून या योजनेअंतर्गत नवीन अर्ज स्विकारणेही बंद करण्यात आले आहे.
Ladki Bahin Yojana स्थगिती देण्याचे नेमके कारण काय?
आर्थिक लाभ देऊन मतदारांवर थेट प्रभाव टाकणाऱ्या योजना त्वरीत थांबवल्या पाहिजेत, अशा सूचना मुख्य निवडणूक आयोगाच्या कार्यालयातून सर्व प्रशासकीय विभागांना देण्यात आल्या आहेत. तसेच, आर्थिक लाभ देणाऱ्या योजनांचा आढावाही घेण्यात आला आहे. मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी सर्व विभागांकडे याबाबतची विचारणा केली आहे. त्यानुसार, महिला आणि बालकल्याण विभागाकडून लाडकी बहीण योजनेसाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक लाभ दिला जात असल्याचे समोर आले होते.
निवडणूक आयोगाने त्यामुळेच या योजनेची माहिती मागवली होती. विभागाने या योजनेसाठीचे निधी वितरण चार दिवसांपूर्वीच थांबवल्याची माहिती आयोगाला दिली आहे. परिणामी निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे ही योजना तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे.
राज्यातील २ कोटींहून अधिक महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र
महाराष्ट्र सरकारने महिलांना आर्थिक सक्षम करण्याकरता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंमलात आणली. या योजनेसाठी ४६ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. तर आतापर्यंत राज्यात २ कोटी २६ लाखांहून अधिक बहिणींच्या खात्यात रक्कम जमा झाली आहे. अडीच लाखांपर्यंत वार्षिक उत्पन्न असलेल्या २१ ते ६५ वयोगटातील महिलांना महाराष्ट्र सरकारकडून दरमहा दीड हजार रुपये दिले जात आहेत.
जुलै महिन्यापासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्य सरकारने राबवली आहे. आतापर्यंत पाच हप्त्यांचे पैसे पात्र महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत. जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरचे पैसे दिल्यानंतर राज्य सरकारने ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे पैसे एकत्र खात्यात जमा केले. तर काही महिलांच्या खात्यात पैसे पोहचलेले नाहीत. ज्यांच्या खात्यावर पैसे जमा झालेले नाहीत त्यांना आणखी काही काळ यासाठी प्रतिक्षा करावी लागणार आहे.
मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेसाठी नवीन अर्ज स्विकारणार का?
सध्या मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेच्या अधिकृत वेबसाईटवरील आकडेवारीवरून 1 कोटी 06 लाख 69 हजार 139 महिलांचे अर्ज पात्र ठरले आहेत. परंतु माध्यमांमध्ये हा आकडा 2 कोटी 20 लाखांच्यावरती सांगितला जात आहे. अद्याप कित्येक महिलांचे अर्ज जमा झालेले नाहीत, तर काही महिलांनी अर्ज करून देखील त्यांच्या अर्जाची छाननी झालेली नाही. त्यातच आता निवडणूकीची आचारसंहिता लागल्यामुळे ऑनलाईन अर्ज स्विकारणे बंद करण्यात आले आहे.
दरम्यान अंगणवाडी सेविंकाकडे अर्ज जमा करून ठेवण्यास महिला प्राधान्य देत आहेत. आचारसंहिता संपल्यानंतर ज्या महिलांनी अंगणवाडी सेविकांकडे अर्ज जमा केले आहेत, त्यांचे अर्ज प्राधान्याने भरले जातील असे सांगितले जात आहे. परंतु यााबाबत अधिकृत माहिती उपलब्ध नाही. त्यामुळे तुर्तास तरी मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना बंद करण्यात आल्याचेच पहायला मिळत आहे.