राज्यातील १३ हजार ११ मिनी अंगणवाड्यांमध्ये नव्याने पदभरती; महिलांना नोकरीची सुवर्णसंधी | Maharashtra Anganwadi Bharti 2024
मुंबई | सध्या राज्यातील अंगणवाड्यांमध्ये १५ हजार मदतनिसांची पद भरती (Maharashtra Anganwadi Bharti 2024) सुरू आहे. २ फेब्रुवारी २०२३च्या महिला व बालविकास विभागाच्या शासन निर्णयानुसार मदतनीस व सेविकांच्या पदभरतीत ७५ गुण शैक्षणिक पात्रतेवर तर २५ गुण जातीनिहाय आरक्षणावरून दिले जातात. मात्र, मराठा आरक्षणानंतरही त्या शासन निर्णयात बदल न झाल्याने ‘एसईबीसी’ प्रवर्गातील उमेदवारांना पदभरतीत पाच गुण मिळत नसल्याचे समोर आले आहे.
केंद्र पुरस्कृत एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत राज्यात एक लाखांवर अंगणवाड्या सुरू आहेत. केंद्र सरकारच्या निर्णयानुसार आता मिनी अंगणवाड्या मोठ्या झाल्या आहेत. त्यामुळे त्याठिकाणी मदतनीस व सेविकांची पदे भरली जाणार आहेत. राज्यातील १३ हजार ११ मिनी अंगणवाड्यांमध्ये नव्याने पदभरती होणार आहे.
Maharashtra Anganwadi Bharti 2024
तत्पूर्वी, भरतीसाठी बारावी उत्तीर्णची अट घातल्याच्या निर्णयाविरुद्ध उच्च न्यायालयात याचिका दाखल असल्याने सेविकांची भरती तुर्तास स्थगित आहे. त्यामुळे पूर्वीच्या ज्या मदतनीस महिला कर्मचारी बारावी उत्तीर्ण आहेत, त्यांना ‘मिनी’च्या मोठ्या झालेल्या अंगणवाड्यांवर सेविका म्हणून प्राधान्याने नेमणूक दिली जात आहे.
अशा अंगणवाड्यांमध्ये मदतनीस पदे नव्याने भरली जात आहेत. त्यात शैक्षणिक पात्रतेवर ७५ गुण असून उर्वरित २५ गुण विधवा, अनाथ, एससी-एसटी, इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, विशेष मागास प्रवर्ग, दोन वर्षांचा अध्यापनाचा अनुभव या बाबींवर आहेत. यामध्ये ‘एसईबीसी’ प्रवर्ग नसल्याने मराठा आरक्षणानंतरही त्या उमेदवारांना भरतीत त्याचा लाभ होत नसल्याची वस्तुस्थिती आहे.
अंगणवाड्यांमधील पदभरती प्रक्रिया
अर्जदारांमधून सेविका किंवा मदतनीस म्हणून उमेदवारांची भरती तथा निवड करताना १०० गुणांचा निकष लावण्यात आला आहे. त्यात इयत्ता बारावी उत्तीर्ण उमेदवारास गुणांच्या टक्केवारीनुसार ४५ ते ६० गुण दिले जातात. याशिवाय पदवीधर असल्यास एक ते पाच गुण (टक्केवारीनुसार), पदव्युत्तरसाठी चार गुण, डीएडसाठी दोन, बीएडसाठी दोन व ‘एमएस-सीआयटी’साठी दोन गुण अतिरिक्त दिले जातात. याशिवाय विधवा, अनाथ उमेदवारासाठी १० गुण, एससी-एसटी प्रवर्गासाठी दहा गुण, इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक व विशेष मागास प्रवर्गासाठी पाच गुण आणि दोन वर्षांचा अनुभव असलेल्यांना पाच गुण, अशी गुणदानाची पद्धत आहे. या ‘एसईबीसी’ प्रवर्ग अजून समाविष्ट झालेला नाही.
शासनाकडून मार्गदर्शन मागविले
सध्या जिल्ह्यातील ८०० मदतनीस पदांची भरती प्रक्रिया सुरू आहे. पण, २ फेब्रुवारी २०२३ च्या शासन निर्णयात ‘एसईबीसी’ प्रवर्ग नसल्याने अडचणी येत असल्याच्या अर्जदारांच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यावर शासनाकडून मार्गदर्शन मागविले आहे.
– प्रसाद मिरकले, महिला व बालविकास अधिकारी, जिल्हा परिषद, सोलापूर
अंगणवाड्यांमधील भरतीची स्थिती
- ‘मिनी’च्या मोठ्या झालेल्या अंगणवाड्या – १३,०११
- मदतनीस पदभरती – १५,०००
- सेविकांची रिक्त पदे – ६,०००
- भरतीचे एकूण गुण – १००