मुंबई पालिकेत अतिक्रमण निर्मूलन निरीक्षकांची 118 पदे भरणार! Mumbai Mahanagar Palika Bharti 2024
मुंबई | मुंबई महापालिका प्रशासनाने अतिक्रमण निर्मूलन निरीक्षकांची 118 पदे भरण्याचे (Mumbai Mahanagar Palika Bharti 2024) ठरवले आहे. लिपिक वर्गातून अंतर्गत भरतीद्वारे ही पदे भरली जातील.
फेरीवाल्यांच्या विषयावरून उच्च न्यायालयाने महापालिकेला फटकारल्यानंतर जून महिन्यात प्रशासनाने मुंबईत फेरीवाल्यांविरोधात कारवाई सुरू केली होती. या कारवाईसाठी पालिकेने वीस महत्त्वाची ठिकाणे निश्चित केली होती. त्यात चर्चगेट, सीएसएमटी परिसर, कुलाबा, दादर स्थानक परिसर, अंधेरी, बोरीवली अशा महत्त्वाच्या ठिकाणच्या कारवाईवर भर देण्यात आला होता.
मात्र गेल्या काही दिवसांपासून ही कारवाई थंडावली असून फेरीवाले पुन्हा दिसू लागले आहेत. मनुष्यबळाअभावी या कारवाईत सातत्य ठेवणे अवघड बनले आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाने अतिक्रमण निर्मूलन निरीक्षक (परवाना निरीक्षक) पदे भरण्याचे ठरवले आहे.
सध्या मुंबई महापालिकेकडे 207 परवाना निरीक्षक असून त्यात आणखी 118 परवाना निरीक्षकांची पदे भरली जाणार आहेत. लिपिकांची परीक्षा प्रक्रिया पूर्ण करून त्यातून ही पदे भरण्यात येणार आहेत.