नाशिक महापालिकेत 668 जागांची भरती; TCS द्वारे होणार भरती | Nashik Mahanagarpalika Bharti 2023

नाशिक | नाशिक महानगरपालिकेतील रखडलेल्या पदभरतीच्या मार्ग अखेर मोकळा झाला आहे. महानगरपालिकेत 668 रिक्त पदांच्या भरती (Nashik Mahanagarpalika Bharti 2023) प्रक्रियेसाठी टीसीएस या शासनमान्य संस्थेबरोबर करण्यात येणारा करारनामा अखेर अंतिम झाला असून, कामगार दिनाच्या दिवशी टीसीएसची करारावर स्वाक्षरी झाल्याने नोकरभरतीवर शिक्कामोर्तब झाले आहे.

नाशिक महापालिकेत आरोग्य वैद्यकीय तसेच अग्निशमन विभागात तब्बल 668 रिक्त पदांची भरती केली जाणार आहे. त्यासाठी महापालिकेच्या प्रशासन विभागाने मागील महिन्यात नोकर भरती (Nashik Mahanagarpalika Bharti 2023) प्रक्रिया राबविण्याबाबतचा करार तयार करून तो टीसीएस संस्थेकडे स्वाक्षरीसाठी सादर केला होता. यामुळे या संस्थेकडून करारनाम्यास हिरवा कंदील देणे बाकी होते.

भरती प्रक्रिया कशी राबवायची, त्याचे नियोजन, परीक्षा शुल्क यासह इतर तांत्रिक बाबी करारनाम्यात नमूद करण्यात आल्या आहेत. करारनामा अंतिम होऊन त्यावर टीसीएस संस्थेची स्वाक्षरी होणे बाकी होते, त्यामुळे भरती प्रक्रिया रखडली होती.

जून महिन्यापासून साधारणपणे भरती प्रक्रियेच्या प्रत्यक्ष कामकाजास सुरूवात होण्याची शक्यता प्रशासन विभागाकडून वर्तविण्यात आली आहे. राज्य शासनाने भरती प्रक्रिया राबविण्याकरता शिफारस केलेल्या टीसीएस आणि आयबीपीएस या दोन संस्थांना नाशिक मनपा प्रशासनाने प्राधान्य दिले होते. त्यापैकी आयबीपीएसला भरतीचा प्रस्ताव दिल्यानंतर या संस्थेने नकार दिला. त्यानंतर टीसीएस या संस्थेबरोबर आता मनपाचा करारनामा पूर्ण झाला आहे.

सात हजार जागा मंजूर; जवळपास अडीच हजार जागा रिक्त 

महापालिकेच्या आस्थापनेवर सात हजार पदे मंजूर आहेत. यापैकी जवळपास अडीच हजार जागा रिक्त असल्याने उर्वरित पाच हजार कर्मचारी अधिकाऱ्यांवर कामाचा ताण निर्माण झाला आहे. यामुळे शासनाने किमान तांत्रिक व गरज असलेल्या विभागातील पद भरतीला तरी मंजूरी द्यावी, अशी  मागणी वजा साकडे प्रशासनाने शासनाला घातले होते. त्यानुसार शासनाने आरोग्य वैद्यकीय व अग्निशमन विभागातील सुमारे ६६८ पदांची भरती करण्यास मंजुरी दिली याशिवाय आस्थापना खर्चाच्या मर्यादेची अट देखील एका वर्षापुरती शिथील केली आहे. यामुळे ही भरती प्रक्रिया राबविणे मनपाला शक्य झाले आहे.

Recent Articles