सेमिकंडक्टर प्रकल्पामुळे बेरोजगारांसाठी नोकऱ्या उपलब्ध, आंतराष्ट्रीय पातळीवर देखील करिअरची संधी | Semiconductor Jobs
रत्नागिरी | देशात सेमीकंडक्टर उद्योगाला मिळालेल्या चालनेमुळे रत्नागिरी जिल्ह्यातील तरुणांसह महाराष्ट्रातील तरूणांना रोजगाराची नवी संधी मिळाली आहे. रत्नागिरी येथे उभारल्या जाणाऱ्या आशिया खंडातील पहिल्या सेमीकंडक्टर प्रकल्पात सध्या नोकरभरतीची प्रक्रिया सुरू झाली आहे.
या प्रकल्पाच्या माध्यमातून बेरोजगार तरुणांना मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. पहिल्या टप्प्यातच हजारो तरुणांना रोजगार मिळण्याची शक्यता आहे. तसेच, कंपनीने तरुणांना परदेशात प्रशिक्षण देण्याचाही निर्णय घेतला आहे. यामुळे अनेक तरुणांना आंतरराष्ट्रीय पातळीवरील रोजगार मिळण्याची शक्यता देखील वाढली आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाल्याचे सांगितले जात आहे.
सेमीकंडक्टर उद्योगात देशभरात होणारी गुंतवणूक:
केंद्र सरकारने सेमीकंडक्टर उद्योगाला मोठा चालना दिली आहे. या उद्योगात सव्वालाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे देशभरात या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती होणार आहे. रँडस्टेंड या कामगार भरती करणाऱ्या कंपनीच्या अहवालानुसार, चालू वर्षात या क्षेत्रात 40 ते 50 हजार तर पाच वर्षांत आठ ते दहा लाख रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत.
रत्नागिरीसाठी काय आहे विशेष?
रत्नागिरी जिल्ह्यात उभारला जाणारा सेमीकंडक्टर प्रकल्प आशिया खंडातील पहिला असा प्रकल्प आहे. यामुळे जिल्ह्याला आंतरराष्ट्रीय पातळीवरील ओळख मिळणार आहे. तसेच, जिल्ह्यातील तरुणांना उच्च दर्जाच्या तंत्रज्ञानाची संधी उपलब्ध होणार आहे.