MSRTC Bharti 2025: राज्य परिवहन महामंडळाच्या ताफ्यात सुमारे ८ हजार नव्या स्वमालकीच्या बसगाड्या येणार असून त्यासाठी राज्य सरकारकडून निधी उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. हा निर्णय एसटीला सक्षम करण्यासाठी आणि प्रवाशांना दिलासा देणारा मानला जात असला, तरी या गाड्यांवर कायमस्वरूपी चालक नेमण्यास सरकारने असमर्थता दर्शवली आहे. परिणामी, या बसेसवर कंत्राटी पद्धतीनेच चालक नियुक्त केले जाणार आहेत.
अनेक वर्षांनंतर एवढ्या मोठ्या संख्येने नव्या गाड्या एसटीच्या ताफ्यात दाखल होत असताना, चालक मात्र केवळ तीन वर्षांच्या कंत्राटावर नेमले जाणार आहेत. विशेष म्हणजे, या गाड्यांचे आयुर्मान १५ वर्षांचे असणार असून निर्धारित कालावधी पूर्ण झाल्यानंतर आणि ठरावीक किलोमीटर पूर्ण केल्यावर त्यांचे एलएनजीमध्ये रूपांतर केले जाणार आहे.
MSRTC Bharti 2025
सध्या चालकांना इतरत्र मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध असल्यामुळे तीन वर्षांचे कंत्राट संपल्यानंतर एवढ्या संख्येने अनुभवी आणि प्रशिक्षित चालक मिळतील का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. भविष्यात चालकांची कमतरता जाणवल्यास एसटी सेवेला गंभीर अडचणींचा सामना करावा लागू शकतो, असा इशारा या क्षेत्रातील जाणकारांनी दिला आहे.
कंत्राटी पद्धतीने चालक नेमल्यास सातत्य राखण्यात अडथळे येतील आणि त्याचे दूरगामी परिणाम एसटीच्या कार्यक्षमतेवर होतील, असा दावा काही तज्ज्ञ करत आहेत. दुसरीकडे, राज्य सरकारने कायमस्वरूपी चालक भरतीस मंजुरी दिल्यास मोठ्या प्रमाणात स्थिर रोजगार निर्मिती होईल आणि अनेक समस्या सुटतील, असे मत बरगे यांनी व्यक्त केले आहे.
