MSRTC Bharti 2025: राज्य परिवहन महामंडळ अर्थात एसटीला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी आगामी काळात तब्बल २५ हजार स्वमालकीच्या नव्या बसेस खरेदी करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. या नवीन बसेस रस्त्यावर धावण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळाची गरज भासणार असल्याने एसटी महामंडळात चालक-वाहक पदांसह इतर अनेक पदांवर भरती होणार असल्याची माहिती परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली आहे.
एसटीच्या ३०७ व्या संचालक मंडळाच्या बैठकीत या भरतीसंबंधीच्या ठरावाला मंजुरी देण्यात आली असून, संबंधित प्रस्ताव शासनाच्या मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे. एकदा शासनाकडून मंजुरी मिळाल्यानंतर, नव्या आकृतीबंधानुसार भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे.
मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केलं की, २०२४ पर्यंत एसटी महामंडळातील भरतीवर उच्च न्यायालयाने मनाई केली होती. मात्र, आता अनेक कर्मचारी सेवानिवृत्त होण्याच्या मार्गावर आहेत. अशा स्थितीत नव्या बसेस चालवण्यासाठी व प्रशासकीय कामकाज सुरळीत ठेवण्यासाठी नव्या भरतीची आवश्यकता अनिवार्य झाली आहे.
सध्या एसटी महामंडळाच्या विविध विभागांमध्ये कुशल मनुष्यबळाचा मोठा अभाव जाणवतो आहे. विशेषतः बांधकाम विभागात, जेथे PPP तत्वावर एसटीच्या जागा विकसित केल्या जात आहेत, तिथे कुशल अभियंत्यांची नितांत गरज आहे. त्यामुळे रिक्त पदे करार पद्धतीने तसेच सरळसेवेच्या माध्यमातून भरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मंत्री सरनाईक यांनी यावेळी प्रत्येक विभागाने आपल्या विभागातील रिक्त पदांचा फेरआढावा घेऊन आवश्यक पदांची यादी एकत्र करून सादर करावी असे निर्देश दिले आहेत. त्यांच्या मते, एसटीच्या सक्षमीकरणासाठी केवळ चालक वा वाहक नव्हे तर तांत्रिकदृष्ट्या सक्षम अधिकारी आणि कर्मचारीही गरजेचे आहेत.
तसेच पुढील काही वर्षांत २५ हजार नव्या बसेस सेवेत दाखल होणार असल्याने चालक-वाहक यांच्यासाठी मोठ्या प्रमाणावर भरती करण्यात येईल. याचबरोबर प्रशासकीय, अभियंता, देखभाल, वाहतूक नियोजन, लेखा व मानव संसाधन यांसारख्या विविध विभागांतील आवश्यक पदांसाठीही भरती प्रस्तावित आहे.
भविष्यातील अपेक्षित भरती विभाग:
| विभागाचे नाव | अपेक्षित भरती पदे |
|---|---|
| चालक व वाहक | नवीन बसेससाठी |
| अभियंता (बांधकाम) | PPP प्रकल्पांसाठी तातडीने आवश्यक |
| प्रशासकीय अधिकारी | विभाग प्रमुख, व्यवस्थापक, सहायक |
| तांत्रिक कर्मचारी | देखभाल व दुरुस्ती विभागासाठी |
| लेखा व मानव संसाधन | आर्थिक नियोजन व कर्मचारी व्यवस्थापन |
एसटी महामंडळाच्या या निर्णयामुळे बेरोजगार तरुणांसाठी नव्या संधी निर्माण होणार असून, भविष्यात विविध शैक्षणिक पात्रतेनुसार भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. त्यामुळे या भरतीसाठी तयार राहणे गरजेचे आहे.
