Shikshak Bharti Updates: नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या पार्श्वभूमीवर मोठा बदल होण्याची चिन्हं दिसत आहेत. येत्या २०२९ पूर्वी राज्यातील सर्व डीएड (डिप्लोमा इन एज्युकेशन) महाविद्यालये बंद होणार आहेत. त्याठिकाणी चार वर्षांचे इंटिग्रेटेड बीएड अभ्यासक्रम सुरू होणार आहेत. त्यामुळे चालू २०२५-२६ हे शैक्षणिक वर्ष हे पारंपरिक डीएड अभ्यासक्रमासाठी शेवटचं वर्ष ठरण्याची शक्यता आहे. या शेवटच्या टप्प्यातील प्रवेश प्रक्रिया २२ मेपासून सुरू होत आहे.
कधीकाळी विद्यार्थ्यांची पहिली पसंती असणाऱ्या डीएड अभ्यासक्रमाची अवस्था आज मात्र बिकट झाली आहे. २०१२-१३ साली राज्यात १,४०५ डीएड महाविद्यालये होती, ती संख्या आता केवळ ५७१ वर आली आहे. यामागचं मुख्य कारण म्हणजे शिक्षक भरतीतील अनिश्चितता आणि खासगी संस्थांकडून घेतलं जाणारं भरमसाट डोनेशन.
काही वर्षांपूर्वीपर्यंत ९०-९५ टक्के गुण मिळवणारे विद्यार्थी डीएडसाठी अर्ज करत असत. इतकंच नव्हे, तर दरवर्षी तीन लाख अर्ज सादर होत असत. मात्र, आज ३० हजार जागा असतानाही केवळ १० हजारांपर्यंतच अर्ज येत आहेत. शिक्षक भरती नियमित न झाल्याने आणि शिक्षणानंतरही रोजगाराची निश्चितता नसल्याने तरुणाईने डीएडकडे पाठ फिरवलेली दिसते.
सध्या प्रचलित पद्धतीनेच प्रवेश प्रक्रिया राबविली जाणार आहे.२००९ मधील आरटीई कायद्यानुसार इयत्ता पहिली ते पाचवीच्या वर्गावरील शिक्षक भरतीसाठी ‘टीईटी’चा (शिक्षक पात्रता परीक्षा) पेपर- एक आणि सहावी ते आठवीच्या वर्गांवरील शिक्षकांसाठी पेपर-दोन उत्तीर्ण असणे बंधनकारक आहे. त्यापुढील वर्गांसाठी ‘टीएआयटी’चे बंधन आहे.
नवीन शैक्षणिक धोरणानुसार ‘डीएड’ बंद होऊन ‘बीएड’ सुरू झाले तरीदेखील पात्रता परीक्षा कायद्यानुसार बंधनकारक असतील, अशी माहिती संचालक महेश पालकर यांनी दिली.
