खुशखबर! आश्रम शाळात १७९१ शिक्षकांची मेगाभरती | Tribal Ashram School Bharti 2025

ही नोकरीची माहिती मित्रांसोबत शेअर करा

Tribal Ashram School Bharti 2025: आदिवासी विकास विभागाच्या अधिपत्याखालील राज्यातील शासकीय आश्रमशाळांमध्ये १७९१ उच्चशिक्षित कंत्राटी शिक्षकांची भरती लवकरच करण्यात येणार आहे. यासंदर्भातील अधिकृत माहिती आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी नागपूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. मात्र, ही भरती करताना गुणवत्तेवर कुठलीही तडजोड केली जाणार नाही, तसेच पेसा कायद्यानुसारच भरती प्रक्रिया पार पडेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

ही घोषणा नागपूर-अमरावती विभागातील आश्रमशाळा सुरू झाल्याच्या पार्श्वभूमीवर करण्यात आली. उईके यांनी यावेळी प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान बाबतही माहिती दिली. देशातील २०० जिल्ह्यांतील ७५ आदिम जमातींच्या विकासासाठी २४,००० कोटींच्या योजनेंतर्गत १५,३३६ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, त्यामार्फत आरोग्य, वसतिगृहे, वीज, पाणी, रस्ते, अंगणवाड्या, कौशल्यविकास, वनधन केंद्रे, सौरऊर्जा, मोबाइल टॉवर्स आदी सुविधा दिल्या जातील. आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी ANM नियुक्ती आणि सुखसुविधांचा भरवसा देखील त्यांनी दिला.

Tribal Ashram School Bharti 2025

मात्र या निर्णयावर राज्यभरातील शिक्षक संघटनांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. नियमित शिक्षकांच्या नियुक्तीऐवजी कंत्राटी पद्धत राबवली जाणे ही चुकीची दिशा आहे, असा आरोप शिक्षक नेते अभ्यंकर यांनी केला आहे. त्यांनी यावर जोरदार आक्षेप घेत कंत्राटी शिक्षकांना मिळणारे अत्यल्प वेतन, सेवाशर्तींचा अभाव आणि स्थैर्य नसल्यामुळे शिक्षकांची गुणवत्ता व जबाबदारीवर शंका उपस्थित होते, असे मत व्यक्त केले. या नियुक्त्यांचा आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रतिकूल परिणाम होण्याची भीतीही त्यांनी व्यक्त केली.

अभ्यंकर यांनी राज्य सरकारला इशारा देत सांगितले की, “शिक्षक भरती प्रचलित विहित पद्धतीने नियमित व शाश्वत स्वरूपातच झाली पाहिजे, अन्यथा महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना उग्र आंदोलन छेडेल.” या पार्श्वभूमीवर शासनाच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले असून, भरती प्रक्रियेत गुणवत्ता, पारदर्शकता आणि शिक्षकांच्या हक्कांचा योग्य विचार केला जातो का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.


ही नोकरीची माहिती मित्रांसोबत शेअर करा