पुणे महापालिकेतील कनिष्ठ अभियंता परीक्षा पुढे ढकलली; नवीन तारीख लवकरच जाहीर होणार | Pune Mahanagarpalika Bharti 2025

ही नोकरीची माहिती मित्रांसोबत शेअर करा

Pune Mahanagarpalika Bharti 2025: पुणे महानगरपालिका अंतर्गत कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) पदांच्या रिक्त जागांसाठी १ डिसेंबर रोजी ऑनलाइन पद्धतीने होणारी परीक्षा अपरिहार्य कारणांमुळे पुढे ढकलण्यात आली आहे. ही परीक्षा नेमकी केव्हा घेतली जाणार, याबाबतची सविस्तर माहिती येत्या दोन ते तीन दिवसांत महापालिका प्रशासनाकडून जाहीर करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

पुणे महापालिकेत कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) पदाच्या एकूण १६९ जागा रिक्त असून या भरती प्रक्रियेला प्रशासनाने प्राधान्य दिले होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर उमेदवारांनी अर्ज केले असून सुमारे ४२ हजार अर्ज महापालिकेकडे दाखल झाले आहेत. यामध्ये पुणे शहरातील साडेआठ हजार उमेदवारांचा समावेश आहे. तसेच छत्रपती संभाजीनगर, सोलापूर, नागपूर, नाशिक, अमरावती, नांदेड, कोल्हापूर यांसह राज्यातील विविध शहरांमधून अर्ज प्राप्त झाले आहेत.

Pune Mahanagarpalika Bharti 2025

या भरतीसाठी २० शहरांमध्ये १ डिसेंबर रोजी परीक्षा घेण्यात येणार होती. मात्र, २ डिसेंबर रोजी राज्यातील विविध नगरपालिका व नगरपरिषदांच्या निवडणुकांसाठी मतदान प्रक्रिया होणार आहे. संबंधित नगरपालिकांमध्ये कार्यरत असलेल्या अनेक कर्मचाऱ्यांनीसुद्धा या परीक्षेसाठी अर्ज केले असून मतदान आणि परीक्षा एकाचवेळी आल्यामुळे अडचणी निर्माण होण्याची शक्यता होती.

ही बाब लक्षात घेऊन परीक्षेला बसू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी तसेच संबंधित कर्मचाऱ्यांनी परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली होती. यासंदर्भात अर्जदारांच्या शिष्टमंडळाने महापालिका आयुक्तांची भेट घेऊन आपली समस्या मांडली होती. उमेदवारांच्या मागणीचा विचार करून महापालिका प्रशासनाने कनिष्ठ अभियंता परीक्षेची तारीख पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, नवीन परीक्षा तारीख, वेळापत्रक व प्रवेशपत्राबाबतची माहिती लवकरच अधिकृत संकेतस्थळावर व संबंधित माध्यमातून प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे. उमेदवारांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत सूचनांकडे लक्ष द्यावे, असे आवाहनही महापालिकेने केले आहे.


ही नोकरीची माहिती मित्रांसोबत शेअर करा