Krushi Vidyapeeth Bharti 2026 | महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठांमध्ये ३,७२३ पदांची भरती लवकरच; सुधारित आकृतिबंधाला मंजुरी

ही नोकरीची माहिती मित्रांसोबत शेअर करा

महाराष्ट्रातील कृषी क्षेत्रातील नोकरी इच्छुकांसाठी महत्त्वाची(Krushi Vidyapeeth Bharti 2026)बातमी समोर आली आहे. राज्यातील चारही कृषी विद्यापीठांमधील गट-अ आणि गट-ब संवर्गातील एकूण ३,७२३ पदांच्या सुधारित आकृतिबंधाला राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. तब्बल २३ वर्षांनंतर कृषी विद्यापीठांचा सुधारित आकृतिबंध मंजूर झाल्याने विद्यापीठांमधील रिक्त पदांच्या भरतीचा मार्ग मोकळा झाला असल्याची माहिती कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे.

राज्यातील कृषी विद्यापीठांमध्ये सध्या मोठ्या प्रमाणावर पदे रिक्त आहेत. त्यामुळे शिक्षण, संशोधन आणि कृषी विस्ताराच्या कामावर परिणाम होत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. नव्या आकृतिबंधामुळे विद्यापीठांमधील मनुष्यबळ व्यवस्थापन अधिक परिणामकारक होण्यासोबतच अध्यापन आणि संशोधनाची गुणवत्ता वाढण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

मंजूर झालेल्या ३,७२३ पदांमध्ये ३,६११ नियमित पदे आणि ११२ पदे बाह्य यंत्रणेद्वारे भरण्यात येणारी आहेत. यापूर्वी २००३ मध्ये आकृतिबंध तयार करण्यात आला होता. त्यानंतर तब्बल २३ वर्षांनी सुधारित आकृतिबंधाला मंजुरी मिळाली आहे.

चार कृषी विद्यापीठांमधील मंजूर पदे : Krushi Vidyapeeth Bharti 2026

कृषी विद्यापीठनियमित पदे
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी१,२१७
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला९१५
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी८९०
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली५८९
एकूण३,६११

हेही वाचा : ISP Nashik Bharti 2026 | इंडियन सिक्युरिटी प्रेस नाशिकमध्ये मेडिकल ऑफिसर पदाची भरती; ८६ हजारांपर्यंत वेतन

बृहन्मुंबई महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती; स्टाफ नर्स, क्ष-किरण तंत्रज्ञ, फेलो आणि इतर पदांसाठी संधी | BMC Recruitment 2026

यामध्ये सर्वाधिक १,२१७ पदे राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठात, त्यानंतर अकोला येथे ९१५, परभणी येथे ८९० आणि दापोली येथे ५८९ पदे आहेत. काही पदे बाह्य यंत्रणेद्वारे भरण्यासही मंजुरी देण्यात आली आहे. गट-क आणि गट-ड संवर्गातील पदांबाबतची कार्यवाही स्वतंत्रपणे सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे.

दरम्यान, चारही कृषी विद्यापीठांमधील पूर्वीची मंजूर पदसंख्या १२ हजार १४२ होती. नव्या आकृतिबंधात ही संख्या ११ हजार ३४६ पर्यंत कमी होण्याची शक्यता असल्याचे कृषी विद्यापीठातील वरिष्ठ सूत्रांच्या हवाल्याने सांगण्यात आले आहे. म्हणजेच सुमारे ७९६ पदे कमी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. यामध्ये कालबाह्य झालेल्या काही पदांचा समावेश असल्याचे सांगितले आहे.

कृषी विद्यापीठांना केंद्राच्या ICAR संस्थेकडून ५० टक्के निधी मिळत असल्याने त्यानुसार आकृतिबंध निश्चित करण्यावर भर देण्यात आला आहे. तसेच कृषी संशोधन, बीजोत्पादन, कृषी विस्तार आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरासाठी आवश्यक मनुष्यबळाला प्राधान्य देण्यात आले आहे. भविष्यात कृषी संशोधनामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात AI तंत्रज्ञानाचा वापर वाढणार असल्याने त्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारण्याच्या दृष्टीनेही पावले उचलली जात असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

कृषी विद्यापीठांमधील भरती प्रक्रियेसंदर्भात वित्त विभागाची मंजुरी आणि शास्त्रज्ञ सेवा मंडळाच्या अध्यक्षपदाचा प्रश्न यांसारख्या अडचणींचाही उल्लेख करण्यात आला आहे. या अडचणी दूर करून भरती प्रक्रिया पुढे नेण्याचे आश्वासन कृषिमंत्र्यांनी दिल्याचे माहितीमध्ये नमूद आहे.


ही नोकरीची माहिती मित्रांसोबत शेअर करा