कॉग्निझंट मध्ये मेगाभरती: २००० पदांसाठी नोकरीची संधी; त्वरित अर्ज करा | Cognizant Technology Solutions Bharti 2025

मुंबई | आयटी क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी कॉग्निझंटने २०२५ मध्ये तब्बल २०,००० फ्रेशर्सची भरती करण्याची मोठी घोषणा केली आहे. या संधीचा लाभ घेऊन अनेक तरुणांचे आयटी क्षेत्रात करिअर सुरू करण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकणार आहे.

Cognizant Technology Solutions Bharti 2025

कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवीकुमार एस. यांनी नुकत्याच पार पडलेल्या मार्च तिमाहीच्या निकालानंतर पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. “आम्हाला मोठ्या प्रमाणावर मॅनेज्ड सर्व्हिसेसची कामं मिळत आहेत. त्यामुळे आम्ही आमच्या टॅलेंट पिरॅमिडचा विस्तार करत आहोत. २०,००० फ्रेशर्सच्या भरतीमुळे आमच्या कर्मचाऱ्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ होईल,” असं कुमार यांनी स्पष्ट केलं. कंपनीने सध्या ऑर्गेनिक ग्रोथच्या दिशेने पाऊल टाकले असून, ही भरती त्या दृष्टीने एक महत्त्वाची पायाभरणी ठरेल, असंही त्यांनी सांगितलं.

विशेष म्हणजे ही भरती प्रक्रिया अशा काळात जाहीर करण्यात आली आहे जेव्हा मागणीतील अनिश्चिततेमुळे कॉग्निझंटच्या भारतातील शाखांनी पुढील आर्थिक वर्षातील भरतीबाबत स्पष्ट माहिती देण्याचं टाळलं होतं. मात्र, आयटी क्षेत्रातील टॉप पाच कंपन्या मिळून चालू आर्थिक वर्षात सुमारे ८०,००० ते ८४,००० नोकऱ्या उपलब्ध करून देतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

कॉग्निझंटकडून नव्याने भरती होणाऱ्या कर्मचाऱ्यांना ‘FlowSource’ या अंतर्गत विकसित केलेल्या खास डेव्हलपर टूलवर प्रशिक्षण दिलं जाणार आहे. हे टूल मशीन-जनरेटेड आणि मानवी कोड एकत्रित करून आधुनिक सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटमध्ये मदत करतं. याशिवाय, आयआयटी आणि एनआयटीमधूनही पॉवर प्रोग्रामर व फुल-स्टॅक डेव्हलपरसाठी खास भरती सुरूच राहणार आहे.

कंपनीच्या चौथ्या तिमाहीत सुमारे १,४०० जनरेटिव्ह एआय प्रोजेक्ट्स कार्यान्वित होते, जे पूर्वीच्या १,२०० च्या तुलनेत वाढ दर्शवतात. रवीकुमार यांनी सांगितलं की, एआय तीन महत्त्वाच्या दिशांमध्ये विकसित केलं जात आहे, ज्यात एआय-प्रणित उत्पादकतेवर विशेष भर आहे. या माध्यमातून कंपन्यांना सुमारे २ ट्रिलियन डॉलर्सच्या तांत्रिक कर्जाचं व्यवस्थापन करता येणार आहे.

पहिल्या तिमाहीत एआयच्या साहाय्याने तयार करण्यात आलेल्या कोडमध्ये २०% पेक्षा अधिक वाढ झाली असून, यामुळे डेव्हलपर्ससाठी नवे दरवाजे खुले झाले आहेत.