TET 2025: शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणीसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ; शेवटच्या वर्षीचे विद्यार्थी देखील पात्र | Maha TAIT Exam 2025 Notification

ही नोकरीची माहिती मित्रांसोबत शेअर करा

पुणे | शिक्षक होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या हजारो उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत आयोजित करण्यात आलेल्या शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) 2025 परीक्षेसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत आता वाढवण्यात आली असून, उमेदवार आता 14 मे 2025 पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकणार आहेत.

या परीक्षेच्या आधीची अंतिम तारीख 10 मे होती. मात्र उमेदवारांकडून आलेल्या मागणीनंतर परीक्षा परिषदेने मुदत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. https://ibpsonline.ibps.in/mscepmar25/ या अधिकृत लिंकवरून ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू आहे.

कोण पात्र?

बी.एड. किंवा इतर व्यावसायिक शिक्षक प्रशिक्षण अभ्यासक्रमाच्या अंतिम सत्रात असलेले किंवा अंतिम परीक्षेला बसलेले विद्यार्थी देखील या परीक्षेस पात्र ठरणार आहेत. तथापि, 5 मे 2025 पूर्वी अर्ज केलेल्या उमेदवारांनी जर या नव्या तरतुदींचा लाभ घ्यायचा असेल, तर त्यांना पुन्हा एकदा नवीन अर्ज करावा लागेल. आधीचे अर्ज रद्द करण्यात येणार आहेत.

परीक्षेचे वेळापत्रक

24 मे ते 5 जून 2025 या कालावधीत TAIT परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येणार आहे. परीक्षा मराठी, इंग्रजी आणि उर्दू या तीन माध्यमांतून देता येईल. दोन तासांच्या या परीक्षेत एकूण 200 गुणांची चाचणी असेल — त्यापैकी 120 गुण अभियोग्यता, तर 80 गुण बुद्धिमत्तेचे असतील.

इतर परीक्षा असल्यास वेगळी बॅच

जर कोणत्याही उमेदवाराचे B.Ed., M.Ed., MPSC किंवा इतर स्पर्धा परीक्षांचे वेळापत्रक TAIT परीक्षेशी जुळत असेल, तर त्यांनी 14 मेपर्यंत परीक्षा परिषदेच्या विशेष लिंकवर आपली माहिती भरावी. अशा उमेदवारांसाठी वेगळ्या बॅचमध्ये परीक्षा घेण्याची सोय करण्यात येईल.

नोंदणी करताना आधार कार्ड महत्त्वाचे

ऑनलाइन अर्ज भरताना उमेदवाराने आपले नाव आधार कार्डातील नोंदीप्रमाणेच भरावे लागेल. नावात कोणतीही तफावत आढळल्यास उमेदवारी रद्द होऊ शकते. परीक्षेच्या वेळी ओळखपत्र म्हणून आधार कार्ड अनिवार्य आहे.

कायदेशीर कारवाई

2018 आणि 2019 मध्ये झालेल्या TET परीक्षांमध्ये गैरप्रकार झालेल्या उमेदवारांची यादी राज्य परीक्षा परिषदेने जाहीर केली आहे. अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी त्या यादीत आपले नाव आहे का, हे तपासावे. चुकीची माहिती दिल्यास उमेदवारी रद्द होणार असून, कायदेशीर कारवाई होऊ शकते.

महत्त्वाची सूचना

ज्या उमेदवारांनी व्यावसायिक अर्हता पूर्ण केली नाही, परंतु अंतिम सत्रात प्रवेश घेतला आहे, त्यांनी अर्ज भरू शकतात. मात्र, परीक्षेत मिळालेले गुण तात्पुरते राखीव ठेवण्यात येतील. उमेदवारांनी परीक्षेच्या एक महिन्याच्या आत गुणपत्रक किंवा वैध प्रमाणपत्र सादर करणे गरजेचे आहे. अन्यथा भरतीसाठी दावा ग्राह्य धरला जाणार नाही.

शिक्षक होण्याची सुवर्णसंधी गमावू नका! तयारी पूर्ण असतानाही जर योग्य वेळी अर्ज केला नाही, तर परीक्षेपासून वंचित राहावे लागेल, अशी स्पष्ट सूचना परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी दिली आहे.

महाराष्ट्र TAIT 2025 अर्ज करण्याची लिंक 

वेबसाइट व अधिक माहिती:


ही नोकरीची माहिती मित्रांसोबत शेअर करा