Krushi Vibhag Bharti 2026: राज्याच्या कृषी विभागासाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असून, सुधारित २३ हजार ४७६ पदांच्या आकृतिबंधाला मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. या सुधारित आकृतिबंधानुसार जुन्या आकृतिबंधातील ३ हजार ९८५ पदे कमी करण्यात आली असून, विभागाच्या गरजेनुसार २ हजार ६८६ नवीन पदांची निर्मिती करण्यात येणार आहे. या बदलामुळे शासनाच्या वार्षिक खर्चात अंदाजे ९२ कोटी ६० लाख रुपयांची बचत होण्याचा अंदाज आहे.
केंद्र सरकारच्या सूचनेनुसार कृषी विभागात कृषी अभियांत्रिकी, मालमत्ता व्यवस्थापन आणि अॅग्रीस्टॅक संचालनालय स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या नव्या व्यवस्थेसाठी कृषी संचालक, अपर संचालक, सहसंचालक (सांख्यिकी) आणि सहसंचालक (माहिती-तंत्रज्ञान) अशी चार पदे निर्माण केली जाणार आहेत. याशिवाय कृषी आयुक्तालयाच्या अखत्यारित एक संचालक, दोन सहसंचालक आणि एक अपर संचालक अशी आणखी चार पदे निर्माण करण्यासही मान्यता देण्यात आली आहे.
तालुका पातळीवरील कार्यालयांच्या रचनेत बदल – Krushi Vibhag Bharti 2026
सुधारित आकृतिबंधामध्ये कृषी विभागाच्या क्षेत्रीय कार्यालयांच्या रचनेतही बदल करण्यात आला आहे. मंडळ कृषी अधिकारी कार्यालये बंद करून ती तालुका कृषी अधिकारी कार्यालयांशी जोडली जाणार आहेत. तसेच उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालये बंद करून त्यांचे कामकाज जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाशी जोडण्यात येणार आहे.
या बदलामुळे तालुका कृषी अधिकारी आणि तंत्र अधिकारी यांच्या पदाचा दर्जा व वेतनश्रेणी याबाबत स्पष्टता निर्माण करण्यासाठी त्यांना गट ‘अ’ दर्जा देण्याचा सुधारित प्रस्ताव पुढील मंत्रिमंडळ बैठकीत मांडण्याची सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
जुन्या आकृतिबंधातील अनुरेखक संवर्ग रद्द करण्यात आला असून, या संवर्गातील पदे सहायक कृषी अधिकाऱ्यांकडे वर्ग करण्यात आली आहेत. तसेच तालुकास्तरावरील सहायक अधीक्षक पदाचे अधीक्षक पदात रूपांतर करण्यात आले आहे.
कोणत्या पदांना किती मंजुरी?
सुधारित आकृतिबंधानुसार कृषी विभागातील विविध पदांची संख्या पुढीलप्रमाणे निश्चित करण्यात आली आहे:
| पद | मंजूर पदे |
|---|---|
| कृषी संचालक | १० |
| कृषी सहसंचालक | १९ |
| अधीक्षक कृषी अधिकारी | ११५ |
| कृषी उपसंचालक | ३२४ |
| तालुका कृषी अधिकारी/तंत्र अधिकारी | ८४९ |
| कृषी अधिकारी गट ‘ब’ (कनिष्ठ) | २,०७० |
| उपकृषी अधिकारी | ३,४४३ |
| सहायक कृषी अधिकारी | १२,९०५ |
अॅग्रीस्टॅकसाठी स्वतंत्र संचालनालय
कृषी क्षेत्रात यंत्रांचा वापर वाढत असल्याने कृषी यांत्रिकीकरणाला अधिक चालना देणे, तसेच विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणे हा या पुनर्रचनेमागील महत्त्वाचा उद्देश आहे. अॅग्रीस्टॅक, कृषी यांत्रिकीकरण आणि मालमत्ता व्यवस्थापनासाठी नव्या कृषी संचालनालयाला ६३ पदांची मंजुरी देण्यात आली आहे.
अॅग्रीस्टॅकच्या कामकाजासाठी अपर संचालक, उपसंचालक, उपसंचालक (भूमी अभिलेख), उपअधीक्षक (भूमी अभिलेख) या दर्जाची प्रत्येकी एक पदे, तसेच तहसीलदारांची दोन पदे प्रतिनियुक्तीने भरण्यात येणार आहेत. म्हणजेच या कामासाठी एकूण सहा पदे प्रतिनियुक्तीने उपलब्ध केली जाणार आहेत. माहिती-तंत्रज्ञानाच्या कामकाजासाठी सहसंचालक दर्जाचे एक पद निर्माण करण्यात आले आहे.
विशेष म्हणजे अॅग्रीस्टॅकशी संबंधित कामांसाठी महसूल विभागावर अवलंबून राहण्याऐवजी स्वतंत्र संचालनालय उभारण्यात येणार असल्याने या कामांना अधिक गती मिळण्याची शक्यता आहे.
आस्थापनेसाठी ५२१ पदे
कृषी विभागाच्या आस्थापना आणि प्रशासकीय कामकाजासाठीही ५२१ पदांना मंजुरी देण्यात आली आहे. यामध्ये सहआयुक्त (प्रशासन) दर्जाचे एक, उपायुक्त दर्जाची चार, मुख्य प्रशासन अधिकारी १२, प्रशासकीय अधिकारी ५२ आणि अराजपत्रित गट ‘ब’ संवर्गातील अधीक्षक दर्जाची ४५२ पदे समाविष्ट आहेत.
या सुधारित आकृतिबंधामुळे कृषी विभागाची प्रशासकीय रचना अधिक सुसूत्र करण्यासोबतच कृषी यांत्रिकीकरण, अॅग्रीस्टॅक आणि माहिती-तंत्रज्ञानाशी संबंधित कामांना संस्थात्मक बळ मिळणार आहे. तसेच पदांची पुनर्रचना करताना शासनाच्या खर्चातही मोठी बचत होणार आहे.
